नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याने कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत.गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र असे असले तरी काही जणांच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. तसेच इतरांचाही जीव धोक्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. बीसलपूर याठिकाणी असणाऱ्या वौनी गावात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आरोग्य अधिकारी जेव्हा गावात याबाबत विचारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना गावकऱ्यांकडून वारंवार परत जाण्यास सांगितलं जात होतं. जेव्हा त्यांनी घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
एसडीएम राकेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉक्टर ठाकुरदास यांना त्यांनी गावाचा दौरा करण्यास पाठवलं होतं. गावात झालेल्या मृत्यूंविषयी चौकशी करण्यासाठी आणि त्यामागील कारण शोधून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. गावातील एका व्यक्तीने त्यावेळी माहिती दिली की पंचायत निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अंत्यसंस्कारानंतर गावातील तीन ज्येष्ठ महिलांसह पाच जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. ही माहिती मिळताच आरोग्य अधिकारी गावात पोहोचले होते.
अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह असतील या भीतीपोटी गावकऱ्यांनी त्यांना गावात येऊ दिलं नाही. त्यामुळे मृतांचं शवविच्छेदन देखील केलं गेलं नाही. यामुळे त्यांचा मृत्यू कशामुळे झाला यामागचं कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे.