नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,207 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,093 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ओडिशातील रायगाडा जिल्ह्यातील 64 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले आहे. राज्यात समोर येत असलेल्या कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात कोरोना संसर्गाचे 71 नवे रुग्ण आढळले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रायगाडाचे जिल्हाधिकारी सरोज कुमार मिश्रा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या सर्व मुलांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हॉस्टेलमध्ये वैद्यकीय पथके देखील तैनात करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'दोन हॉस्टेलमधून 64 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तपासणीदरम्यान 64 नमुने पॉझिटिव्ह आढळले. मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते सर्व निरीक्षणाखाली आहेत. हॉस्टेलमधील नियुक्त अधिकारी नमिता सामल यांच्या म्हणण्यानुसार, कोटलागुडा येथील अन्वेषा वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापैकी कोणालाही संसर्गाची लक्षणे नाहीत आणि त्यांना वेगळं ठेवण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अधिकारी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत. त्याचवेळी बिसामकटक ब्लॉकमधील हातमुनीगुडा सरकारी हायस्कूलमधील 20 विद्यार्थी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही मुले शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहतात. या हॉस्टेलमध्ये जिल्ह्यातील सुमारे आठ शाळांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.