नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,37,03,665 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,62,727 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,120 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,58,317 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाचं संकट असतानाच काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुंभमेळ्यामुळे कोरोना संसर्ग झाल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुंभमेळ्याला भेट दिलेल्या एका कोरोनाग्रस्त महिलेमुळे बंगळुरुमध्ये आणखी 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. . टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्तानुसार, 67 वर्षीय महिलेने उत्तराखंड येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंत तिने अनेकांना संक्रमित केलं आहे. पश्चिम बंगळुरुमधील स्पंदना हेल्थकेअर आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमधील 13 रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे. उपचारानंतर सर्व जण बरे झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भय इथले संपत नाही! एका महिलेमुळे 33 जण कोरोना पॉझिटिव्ह
कुंभमेळ्यावरुन परतल्यानंतर महिलेने कोविड चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिच्या पतीची आणि सुनेची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. स्पंदना हेल्थकेअरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या वृद्ध महिलेच्या सूनेला देखील कोरोनाची लागण झाली होती. सूनेची चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी कोणतीही लक्षणे नसल्याचे तिने सांगितले. याची माहिती मिळताच बीबीएमपी येथील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग करण्यास सुरुवात केली. स्पंदना रुग्णालयातील त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली.
रुग्णालयातील 13 रुग्णांसह 2 कर्मचारी हे पॉझिटिव्ह निघाले. तसेच कुंभमेळ्याहून परतलेल्या कुटुंबातील 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान सर्वांवर उपचार करण्यात येत असून काही जण बरे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. स्पंदना रुग्णालयातील अनेक जण कोरोनाबाधित आढळल्याने रुग्णालयाचा एक मजला बंद करावा लागला आणि त्याला कोविड केअर वॉर्ड घोषित करावे लागले अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश आर गौडा यांनी दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.