नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,37,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 488 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील पाच राज्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत महाराष्ट्र टॉपवर आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लहान मुलांना देखील आता कोरोनाचा संसर्ग होत आहे. ओडिशामध्ये तब्बल 927 मुलांना तर भोपाळमध्ये 170 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ओडिशामध्ये शनिवारी संसर्गाची 8,845 नवीन प्रकरणे आढळल्यानंतर, येथील एकूण संक्रमित लोकांची संख्या 11,96,140 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये 927 मुले देखील आहेत. दैनंदिन संसर्ग हा गेल्या 10 दिवसांतील सर्वात कमी आहे. शुक्रवारी राज्यात 9,833 रुग्णांची नोंद झाली आणि साथीच्या आजाराने सहा रुग्णांचा मृत्यू झाला. खुर्दा जिल्ह्यात सर्वाधिक 2,528 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर सुंदरगडमध्ये 1,001 रुग्ण आढळले आहेत आणि कटकमध्ये 628 रुग्ण आढळले आहेत.
170 मुलं कोरोना पॉझिटिव्ह
मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 11274 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत. काल हा आकडा 9385 होता. भोपाळच्या नवीन प्रकरणांमध्ये, एका दिवसात 170 मुलं पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्य सरकार देखील सतर्क झाले आहे. रुग्णालयात बालरोग वैद्यकीय सेवा वाढविण्यात येत आहेत. मध्य प्रदेशमध्ये संसर्ग दर 12% पर्यंत वाढला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,88,884 वर
वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (22 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,37,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,88,884 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 21,13,365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.