नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. सूरतमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे.
कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येतात. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सूरतमध्ये आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ होत असताना 12 सदस्यीय केंद्रीय दलाने मागील आठवड्यात सुरतचा दौरा केला होता. वराछा परिसरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी टोकन घ्यावं लागत आहे. टोकन घेतल्यानंतर लोक आपली वेळ येईपर्यंत वाट पाहतात. तसेच टोकन सिस्टममध्येही काही लोक लाच देऊन लवकर अंत्यसंस्कार करत असल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्ता हरिश गुज्जर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी टोकन घेऊन अनेक लोक वाट पाहत असल्याची माहिती दिली.
अंत्यसंस्कारासाठी तासनतास लाईनमध्ये उभं राहायचं नसल्यास 1500 ते 2000 द्यावे लागतील असं काही लोक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना सांगत असल्याचा आरोपही हरिश यांनी केला आहे. सूरतमधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शहरात एकाचवेळी 25 लोकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतील, यासाठी तयारी सुरू आहे. कोविड आणि नॉन-कोविड मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागत आहेत. जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परिस्थिती गंभीर आहे आणि संक्रमणापासून बचावासाठी घरात राहणं आणि सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा प्रकोप! 'या' देशात मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही; कबरींतून उकरून काढावे लागले सांगाडे
ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्वात मोठं शहर असलेल्या असलेल्या साओ पाउलोमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानमध्ये आता जागाच शिल्लक राहिलेली नाही. कोरोनामुळे भयावह परिस्थिती असून कर्मचाऱ्यांकडून जुने सांगाडे बाहेर काढण्यात येत आहेत आणि त्याठिकाणी नवीन मृतदेहांसाठी जागा तयार केली जात आहे. गेल्या एका आठवड्यात ब्राझीलमध्ये जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काही वर्षांपूर्वी दफन केलेल्या कबरींवरील वरील भाग काढण्यात येत असून तेथील सांगाडे काढण्यात येत आहे. साओ पालोमधील ब्राझीलमधील सर्वात मोठ्या कब्रस्तानापैकी एक असलेल्या विला फोरमोसा सिमेट्रीमध्ये कर्मचारी मास्क, पीपीई किट घालून दिवस-रात्र कबर खोदत आहेत.