नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,66,161 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,754 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान एक धक्कादाक माहिती समोर आली आहे. 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे असलेल्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये 26 प्राध्यापकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने विद्यापीठात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मनसुर यांच्या भावाचाही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तारीक यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआरला) लिहिलेल्या पत्रामध्ये विद्यापीठातील कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या चाचण्या करुन येथील व्यक्तींना संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल संशोधन करावं अशी मागणी केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये 26 प्राध्यापकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 16 वर्किंग आणि 10 निवृत्त फॅकल्टी मेंबर्सचा समावेश आहे. कोरोना रुग्णांना एका नव्या आजाराचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. "म्यूकोरमायसिस" असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.
भयंकर! कोरोनाग्रस्तांना आता 'या' आजाराचा मोठा धोका; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे
"म्यूकोरमायसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. सूरतमध्ये जीव वाचवण्यासाठी तब्बल 8 रुग्णांचे हे डोळे काढण्यात आले आहेत. गुजरातच्या सूरत शहरात गेल्या 15 दिवसांत अशी 40 प्रकरणं सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांचे डोळे काढावे लागल्याची घटना समोर आली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.