नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,18,92,676 वर पोहोचली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,01,078 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,38,270 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे.
कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या नातेवाईकांची अक्षरश: लूटमार सुरू आहे. कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेने नेण्यासाठी अवाजवी पैसे आकारण्यात येत आहेत. गुरगाव ते लुधियानातील रुग्णालयात रुग्ण नेण्यासाठी एका रुग्णवाहिकेने तब्बल 1.20 लाख घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिमोह कुमार बुंदवाल असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं आहे. ही व्यक्ती डॉक्टर असून रुग्णवाहिकेचा व्यवसाय देखील करत आहे. त्याला दिल्लीच्या इंदरपुरी येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यापासून हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका रुंग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या शहरात रुग्णवाहिकेची योग्य सेवा नसल्याने दिल्लीतील एका रुग्णवाहिकेच्या चालकाशी संपर्क साधला. सुरुवातीला एका रुग्णाला गुरगावहून लुधियाना येथे नेण्यासाठी तब्बल 1.40 लाख मागण्यात आले. नातेवाईकांनी पैसे कमी करण्याची विनंती केल्यानंतर त्याने 20 हजार रुपये कमी केले आणि 1.20 लाख रुपये लागतील असं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना आरोपी कोरोना रुग्णांना पोहचवण्यासाठी दुप्पट पैसे घेत असल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका; 'या' शहरात आढळले रुग्ण
रुग्णालयातील ईएनटी विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी "मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण त्यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे" असं सांगितलं. ब्लॅक फंगसची लक्षण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. खासकरून मधुमेह, किडनी, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. अशातच आता या आजाराचा धोका निर्माण झाला असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.