नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात गेल्या काही दिवसांत 44 कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये 19 प्राध्यापकांचा समावेश आहे. तर 25 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने विद्यापीठात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मनसुर यांच्या भावाचाही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तारीक यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआरला) लिहिलेल्या पत्रामध्ये विद्यापीठातील कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या चाचण्या करुन येथील व्यक्तींना संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल संशोधन करावं अशी मागणी केली आहे. प्राध्यापक डॉक्टर अर्शी खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, "विद्यापीठाचं कब्रस्तान आता पूर्ण भरलं आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनेक मोठे डॉक्टर, वरिष्ठ प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डीन, चेअरमन यांचाही समावेश होता. निरोगी आणि तंदुरुस्त असणाऱ्या अनेक तरुणांचाही मृत्यू झाला आहे."
अलिगढ विद्यापीठात जवळपास 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यामधील 16 हजार विद्यार्थी 19 हॉस्टेल्समध्ये राहतात. सुरुवातीला जेव्हा विद्यापीठ बंद होतं, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्येच आश्रय घेतला होता. पण आता तेदेखील येथून जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचं दिसत असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याचं कारण सांगितलं आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचं प्रमाण वाढलं असावं असं आयसीएमआरने म्हटलं आहे.
बापरे! ...म्हणून कोरोनाची दुसरी लाट जास्त खतरनाक; तरुणांना आहे मोठा धोका; ICMR ने सांगितलं कारण
तरुणांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी माहिती दिली आहे. "पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यामध्ये वयात जास्त फरक असल्याचं दिसत नाही. प्रतिकूल परिणामासाठी 40 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात" असं म्हटलं आहे. भार्गव यांनी "तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण थोडं वाढल्याचं दिसत आहे, कारण अचानक त्यांना घऱाबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशात कोरोनाच्या व्हायरचा नवा प्रकार आढळत असून त्याचाही परिणाम झालेला असू शकतो" असं म्हटलं आहे. कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, आणि अरुणाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.