नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक जण उपचार शोधतो आहे. यातच शेकडो लोक कोरोनावरील उपचारासंदर्भात दावा करत आहेत. कोणी गोमूत्राने उपचाराचा दावा करत आहे. तर कोणी होम-हवन यावर विश्वास ठेवत आहे. अशीच एक घटना आंध्र प्रदेशामध्ये (Andhra pradesh) समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये एका माजी मुख्याध्यापकाने चमत्कारी औषध घेतल्यानंतर कोरोना बरा झाल्याचा दावा केला होता. सोशल मीडियावर ही बातमी वेगाने पसरली आणि त्यानंतर ते औषध घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र आता कोरोनाचं चमत्कारी औषध घेऊन बरं झाल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेल्लोरे य़ेथील कृष्णपटणम गावातील माजी मुख्याध्यापक एन कोटैया यांनी कोरोनावर चमत्कारी औषध घेतल्याचा दावा केला होता. त्यांनी यासाठी बी. आनंदैया यांनी तयार केलेल्या आयुर्वेदीक अंजनाचा दाखला दिला होता. त्यानंतर हे औषध घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री माजी मुख्याध्यापक एन कोटैया यांची ऑक्सिजन लेव्हल खालावली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने नेल्लोरमधील शासकीय जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
चमत्कारी औषध असल्याचा दावा करणारे आयुर्वेदिक चिकित्सक आनंदैया यांच्या टीममधील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं रॅपिड अँटिजेन चाचणीतून समोर आलं आहे. तर 20 गावकऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने त्यांचे आरटी-पीसीआर नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लोर (Nellore) जिल्ह्यातील एका छोट्या गावात आयुर्वेदिक औषधासाठी लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. येथे दूरवरून आलेले लोक कोरोनाच्या उपचारासाठी रोजच्या रोज रांगेत उभे राहतात. आनंदैया नावाच्या एका आयुर्वेदीक डॉक्टरने आपल्या औषधाने कोरोनावरील यशस्वी उपचाराचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यामुळे येथे दूरवरून लोक यायला सुरुवात झाली आहे. एवढेच नाही, तर शेजारील राज्यांतूनही येथे मोठ्या प्रमाणावर लोक यायला सुरुवात झाली आहे.
आंध्रप्रदेशात कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी उडाली झुंबड
आनंदैया आपले आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना आयड्रॉपदेखील दिला जात आहे. मात्र, आयुर्वेदिक औषधाने कोरोना बरा होतो, याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा अद्याप नाही. तरीही येथे मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत. येथे येणाऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे, की 'याचा प्रयोग करणे काही वाईट नाही. रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे, ऑक्सिजन बेडसाठी या रुग्णालयातून, त्या रुग्णालयात पळापळ सुरू आहे. यात अनेत लोक आपला जीव गमावत आहेत. आम्हाला आशा आहे, की औषध उपयोगी ठरेल.' आयुष आयुर्वेदचे डॉक्टर या औषधाची तपासणी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. देवी नाराज झाली, देवीचा कोप झाला असं म्हणत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं. सर्व नियम धाब्यावर बसवले. देवीला आनंदी करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी एकत्र आल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशच्या पूर्वेकडील गोदावरी जिल्ह्यात भक्तांनी देवीची प्रार्थना केली. देवीच्या कोपामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं असल्याने ते प्रार्थनेसाठी एकत्र जमले होते. पूर्व गोदावरी भागाचे पोलीस अधीक्षक नयीम असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, ग्रामस्थांचा हा समज आहे की देवीचा कोप झाल्याने हे सर्व घडलं आहे. म्हणूनच देवीला खूश करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याचं ठरवलं.