नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,54,96,330 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,67,334 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4529 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे (Corona Virus) आतापर्यंत देशभरात तब्बल 2,83,248 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान काही राजकीय पक्षाचे नेते हे कोरोनासंदर्भात वादग्रस्त विधानं करत आहेत. तसेच अजब उपाय सांगून कोरोनाला पळवून लावा असा दावा देखील करत आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे.
मेरठमध्ये शंखनाद आणि होम-हवनाच्या धुरांमुळे कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्याची तयारी केली जात आहे. भाजपाचे नेते गोपाल शर्मा (BJP Gopal Sharma) यांनी कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला आहे. गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून कोरोना व्हायरस नष्ट करता येऊ शकतो असे म्हटलं आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोपाल शर्मा हे सायकलवर एक यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
यज्ञामध्ये गोवऱ्या, देशी गायीचे तूप, आंब्याच्या झाडांच्या काड्या, कापूर हे सगळं एकत्र करून हवन पेटवण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे. यज्ञ कुंडातील धुरामधून वातावरणातील हवा शुद्ध होते आणि धोकादायक व्हायरस नष्ट होतो. तसेच ऑक्सिजनचं प्रमाण देखील वाढते असा दावाही गोपाल शर्मा यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी देखील गोमूत्र प्यायल्याने कोरोना होत नसल्याचा दावा केला होता.
नेता असावा तर असा! मिझोरमच्या कोरोनाग्रस्त मंत्र्यांची अनोखी सेवा; रुग्णालयात पुसली लादी
कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांनी रुग्णालयात सेवा केली असून रुग्णालयात लादी साफ करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. मिझोरमचे ऊर्जामंत्री आर. लालझिरलियाना (R Lalzirliana) हे कोरोना पॉझिटिव्ह असूनही रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये सेवा करत आहेत. लालझिरलियाना यांना 11 मे रोजी कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आधी ते दोघेही होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र त्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने लालझिरलियाना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लालझिरलियाना रुग्णालयात सेवा करत असून लादी पुसताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर कमी वेळात खूप व्हायरल झाला.