नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 15 कोटींवर पोहचली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या जवळपास दोन कोटींपर्यंत पोहोचत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. "रोज गोमूत्र प्यायल्यास कोरोना होणार नाही" असं म्हटलं आहे.
भाजपाचे बुलंदशहचे आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि कोरोनासारखे आजार होणार नाहीत असा दावा केला आहे. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं देखील म्हटलं आहे. देवेंद्र सिंह लोधी यांनी रोज 25 एमएल गोमूत्र प्यायल्याने सर्व आजार पळून जातात असं म्हटलं आहे. तसेच लिव्हर, किडनी यांनाही खराब होऊ देत नाही असं म्हटलं आहे. लोधी यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. उत्तराखंडचे भाजपा आमदार महेंद्र भट्ट यांनीदेखील उपाशी पोटी गोमूत्रचं सेवन केल्यास कोरोनाचा खात्मा होईल असा दावा केला होता.
देवेंद्र सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपा नेते राजीव शुक्ला यांनी जोरदार टीका केली आहे. "हे सर्व अद्यापही सुरू आहे. कोर्टाने यांना शांत राहण्यास सांगितलं पाहिजे. अशा विधानांमुळे लोकांमधील रोष वाढतो. भाजपा आमदारांना अशा विधानांची आता सवय झाली आहे. कोणीही गोमूत्रच्या विरोधात नाही. पण डॉक्ट असल्याप्रमाणे कोरोनावरील इलाज सांगून गोमातेला यामध्ये आणू नये" असं म्हटलं आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना अनेक देशांमध्ये वेगाने लसीकरण देखील सुरू आहे. याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मॉडर्नाच्या (Moderna) कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.
मोठी बातमी! WHO कडून Moderna लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी
मॉडर्ना लसीला अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. अमेरिकेच्या या लस निर्मात्या कंपनीशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत एस्ट्राजेनेका, फायझर-बायोनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन लसींचा आपात्कालीन वापरास परवानगी दिली आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत चीनच्या सिनोफार्मा आणि सिनोवाक लसींना देखील अशीच परवानगी दिली जाऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीफन बॅन्सेल यांनी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास ग्रीन सिग्नल दिला आहे असं म्हटलं आहे.