नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,04,58,251 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,617 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,00,312 लोकांना जीव गमवावा लागला आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून विविध उपाय केले जात आहेत. देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये तज्ज्ञांच्या विशेष टीम रवाना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि उपाययोजनांसाठी या टीम पाठवण्यात आल्या आहेत. केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, ओडिशा, आणि छत्तीसगडचा यात समावेश आहे. विशेष टीम राज्यांमध्ये कोरोना व्यवस्थापन, देखरेख, कंटेन्मेंटची प्रक्रिया आणि टेस्टिंग सारख्या बाबी पाहणार आहे. केंद्रीय टीम या राज्यांमधील कोविड स्थितीचे मूल्यांकन करतील आणि आवश्यक उपयायोजना सुचवतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
मणिपूरच्या टीमचे नेतृत्व ईएमआरचे अतिरिक्त डीडीजी आणि संचालक डॉ. एल. स्वस्तीचरण, अरुणाचल प्रदेशच्या टीमचे एआयआयएच अँड पीएचचे प्राध्यापक डॉ. संजय साधुखान, केरळच्या टीमचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. रुची जैन, ओडिशाच्या टीमचे एआयआयएचचे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि छत्तीसगडच्या टीमचे नेतृत्व हे एम्स रायपूरचे सहायक प्राध्यापक डॉ. दिबाकर साहू करतील अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाच्या संकटात आतापर्यंत तब्बल 1500 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तब्बल 800 डॉक्टर्सचा बळी घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association -IMA) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे 800 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे. बिहार आणि दिल्लीतील सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर यातील अनेक डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. तर काहींनी एक डोस घेतला होता. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आयएमएचे डॉ. जयेश लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्या राज्यात कोरोनामुळे किती डॉक्टरांचा मृत्यू झाला यावर रिसर्च सुरू आहे. तसेच यातील किती डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं याचीची माहिती घेण्यात येत आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या डॉक्टरांमध्ये तरुण आणि वृद्ध डॉक्टरांचाही समावेश आहे. मात्र तरुण डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे. रुग्णांवर उपचार करतानाच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती.