नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा फटका हा चिमुकल्यांना देखील बसला आहे. अनेक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील रुग्णांची संख्या ही दोन कोटींवर गेली असून तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे एका मुलाचं फुफ्फुस हे 90 टक्के खराब झालं आहे. मात्र त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याची हैराण करणारी बाब समोर आली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे आहे. तसेच त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिहारमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. पाटणाच्या IGIMS मध्ये एका 8 वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. त्याचं 90% फुफ्फुस खराब झालं आहे. किडनी आणि लिव्हरही संक्रमित झालं आहे. पण त्याची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली, अँटिजेन टेस्ट केली. पण दोन्ही टेस्टमध्ये कोरोनाचं निदान झालं नाही. दोन्ही टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सिटी स्कॅनमध्ये त्याच्या कोरोनाचं निदान झालं, सिटी स्कॅन रिपोर्ट पाहून तर डॉक्टरांना धक्काच बसला.
फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरला गंभीर इन्फेक्शन
आयजीआयएमएसचे अधीक्षक डॉ. मनीष मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला ताप, खोकला होता. तसेच श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्याची अवस्था पाहू त्याला तात्काळ आपत्कालीन परिस्थितीत दाखल करण्यात आलं. त्याच्या काही चााचण्या करण्यात आला. ज्यामध्येच त्याचं फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरला गंभीर इन्फेक्शन झाल्याचं दिसलं. मुलाच्या जीवाला धोका होता. सिटी स्कॅनमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत होतं.
दर मिनिटाला 16 लीटर ऑक्सिजन
मुलाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरही चिंतेत पडले. कोरोनाची ही तिसरी लाट तर नाही ना, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली. मुलावर तात़डीने उपचार सुरू करण्यात आले. या मुलाला अँटिबायोटिक्स, रेमडेसिवीर आणि एस्टेरॉइजसह नेब्युलाइझेशन देण्यात आलं. दर मिनिटाला 16 लीटर ऑक्सिजन देण्यात आला. त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांची टीम दाखल होती. अखेर सुदैवाने डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरले. मुलाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. मुलाची बिघडत चाललेली प्रकृती स्थिर झाली. या मुलाची प्रकृती आधीपेक्षा बरीच सुधारली असून तो स्वतःहून जेवू शकतो अशी माहिती डॉ. मंडल यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.