नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. याच दरम्यान आता चेन्नईजवळ असलेल्या वंडलूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात (Arignar Anna Zoological Park ) एका सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सिंहिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आहे. तसेच 9 सिंह हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राणिसंग्रहालयातील 9 वर्षांच्या निला नावाच्या सिंहिणीचा 3 जून रोजी मृत्यू झाला. एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंहांचा कोरोना चाचणी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठवण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.
26 मे रोजी संसर्गाची लक्षणं ही समोर आली होती. प्राणिसंग्रहालयातील एनिमल हाउस 1 मध्ये ठेवण्यात आलेल्या 5 सिंहांमध्ये भूक न लागणं आणि अधून-मधून खोकला येत असल्याची लक्षणं दिसली. सिंहांच्या रक्ताचे नमुने हे तामिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पाठण्यात आले, असं प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आलं. प्राणिसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली गेली आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली होती.
आठ सिंहाना कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन सिंहिणी देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कमधील (Etawah Safari Park) दोन सिंहिणी पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. गौरी आणि जेनिफर असं या सिंहिणींचं नाव असून त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सफारी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आता दोन सिंहिणींची प्रकृती स्थिर आहे. इटावा सफारी पार्कचे संचालक केके सिंह यांनी याबाबत माहिती दिली होती. इटावा सफारीमध्ये असणाऱ्या या दोघींची तब्येत गेले काही दिवस खराब होती.