नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. यामध्ये अनेकांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली आहेत. उपचारादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला आहे. असं असताना एक सकारात्मक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मृत्यूवर मात केली आहे. कोरोनासह इतरही आजारांविरोधातील लढाई त्यांनी यशस्वीरित्या जिंकली आहे. चेन्नईमध्ये एक दुर्मिळ घटना घडली आहे. कोरोना संसर्गामुळे तब्बल 109 दिवस ईसीएमओ (ECMO) प्रक्रिया आणि व्हेंटिलेटरवर राहावं लागलेले 56 वर्षांचे मुदिज्जा नुकतेच ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे त्यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपणाची (Lung Transplant) शस्त्रक्रिया करावी लागली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतल्या क्रोमपेट येथील रेला हॉस्पिटल या मल्टिस्पेशालिटी क्वाटर्नरी केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार सुरू होते. फुप्फुसावरच्या शस्त्रक्रियेदरम्यान किंवा फुप्फुस प्रत्यारोपण सुरू असतानाच्या ते काम नीट सुरू राहावं म्हणून ECMO ही प्रक्रिया केली जाते. फुप्फुसातील संसर्ग गंभीर असल्यास एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) ही प्रक्रिया करावी लागते. तब्बल 109 दिवस ECMO आणि व्हेंटिलेटरवर राहूनही मुदिज्जा यांना फुप्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकता न भासता ते ठणठणीत बरे झाले आहेत.
मुदिज्जा यांना एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर रेला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांना मध्यम स्वरूपाचा कोविड-19 न्यूमोनिया झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांची ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी 92 टक्के होती. त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना प्रति मिनिटाला 10 लीटर ऑक्सिजनची गरज भासू लागली. हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण करणारे सर्जन आणि ज्येष्ठ सल्लागार डॉ. सी. अरुमुगम यांच्या नेतृत्वाखालच्या वैद्यकीय टीमने त्यांच्यावर ECMO सुरू करण्याचा निर्णय घेतला.
रुग्णाच्या प्रकृतीत सुरुवातीचे चार-पाच आठवडे फारशी सुधारणा झाली नाही. तरीही ते उपचार सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 50 दिवस ECMO सुरू राहिल्यानंतर फुप्फुसांमध्ये थोडी सुधारणा दिसू लागली. त्यानंतर फुप्फुस प्रत्यारोपणाशिवायच ही प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जसजशी फुप्फुसांमध्ये सुधारणा होऊ लागली, तसतशी ही प्रक्रिया हळूहळू कमी करून बंद करण्यात आली, असं डॉक्टरांनी म्हटलं. तसेच 109 दिवसांनी, 29 जुलै 2021 रोजी त्यांचा व्हेंटिलेटरही काढण्यात आला. त्यानंतर लवकरच मुदिज्जा यांना बसायला लावण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.