नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांच्यावर पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. चेन्नईमध्ये एक धार्मिक कार्यक्रम हा कोरोनाचा "सुपर स्प्रेडर" ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान चेन्नईतील एका मंदिर उत्सवात भाग घेतलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात जवळपास 300 लोक सहभागी झाले होते. यापैकी 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (GSS) ने देखील पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे नमुने 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आले होते आणि काही दिवसात पुन्हा नमुने घेतील. अहवालांनुसार संक्रमित लोकांची प्रकृती सध्या ठीक आहे. त्याच्यावर ईएसआय, केएमसी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
2.29 लाख रुपये दंड वसूल
कोणताही सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासाठी, मंदिरालगतच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मोठा मेळावा टाळण्यासाठी सरकारने शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सार्वजनिक प्रार्थनास्थळांवर सार्वजनिक प्रवेशावर बंदी घातली होती. कोरोनाची वेगाने प्रसार होऊन रुग्णसंख्या वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या चेन्नई येथील कार्यक्रमाच्या आयोजकांकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. 2,812 विवाह हॉल, 60 हॉटेल्स सरकारने ठरवलेल्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळले आहेत, ज्यातून 2.29 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल मे 2021 पासून 3.70 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांनी लस घेतलेली नाही. ज्यांनी अद्याप लसीकरण केले नाही त्यांना लसीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आता या भागात शिबीर उभारले आहेत. तसेच चेन्नईच्या इरोड, कोईम्बतूर इत्यादी भागात गेल्या दोन आठवड्यांत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 11 ऑगस्ट रोजी चेन्नईमध्ये 243 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे शहरातील एकूण प्रकरणांची संख्या 540,300 झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.