नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,82,970 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 441 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने देखील चिंता वाढवली आहे. असं असताना प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. जंगलच्या राज्यासोबत इतरही प्राणी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तामिळनाडूच्या अरिगनार अण्णा या प्राणीसंग्रहालयात एक घटना घडली आहे. कोरोना तपासणीसाठी नमुने घेत असतानाच एका सिंहाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राणीसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पीटीआयसोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय बिबट्याचं नाव जया होतं आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आता मृत्यू झाला आहे. तर 5 वर्षीय सिंहाचं नाव विष्णू असं होतं आणि अन्ननलिकेत असलेल्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला आहे असं म्हटलं आहे. या जेव्हा पशुवैद्यकीय कोरोना नमुने घेत होते. तेव्हा या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
प्राणीसंग्रहालयातील 70 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं
प्राणीसंग्रहालयातील तब्बल 70 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसली असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचारी आधीपासूनच क्वारंटाईन आहेत. आम्हाला अशी शंका होती, की प्राणीही कोरोनाबाधित होऊ शकतात. त्यामुळे, आम्ही त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावं लागतं. गेल्या वर्षीही कविता नावाच्या सिंहिणीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तिला कॅन्सरही होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेन्शन वाढलं! देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं किती गरजेचं?; WHO ने दिलं उत्तर
भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावायला हवा की नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेने आता भाष्य केलं आहे. भारतात सध्या पूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डब्ल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी, रॉड्रिको एच. ऑफ्रिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतासारख्या देशात, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लादणे आणि प्रवासावर बंदी घालणे यासारखी पावलं नुकसान पोहोचवू शकतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोना व्हायरसच्या साथीचा सामना करण्यासाठी, जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे. WHO प्रवास बंदीची शिफारस करत नाही किंवा लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्याचा आग्रह धरत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.