नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,483 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,23,622 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान चेन्नईमध्ये 25,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनाच्या भयानक परिणामाबाबत माहिती समोर आली आहे. चेन्नईतील सरासरी आयुर्मान सुमारे 4 वर्षांनी कमी झाल्याचे एका रिसर्चमध्ये समोर आले आहे. ते 70.7 वर्षांवरून 66.4 वर्षांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.
लान्सेट इन्फेक्शन डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, जून 2021 पर्यंत चेन्नईमध्ये कोरोनामुळे सुमारे 8000 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय लॉकडाऊन, वेळेवर उपचार न मिळणे आणि वैद्यकीय सेवेचा अभाव यामुळेही लोकांना जीव गमवावा लागला आहे. TOI नुसार, सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. टीएस सेल्वा विनयगम, जे या रिसर्चचा भाग होते, म्हणाले की अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये भारतापेक्षा जास्त वृद्ध लोक आहेत. तरीही, एक हजार लोकांमध्ये सरासरी 1.6 ते 2.1 अधिक मृत्यू नोंदवले गेले, तर चेन्नईमध्ये ते एक हजारामध्ये 5.2 होते. हा मृत्यू दर सामान्यपेक्षा जास्त आहे. या उच्च मृत्युदरामुळे, चेन्नईतील आयुर्मान कमी झाले. 2020 मध्ये ते 69.5 वर्षे कमी झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ते आणखी कमी केले.
तामिळनाडूमधील जन्म आणि मृत्यूचे निबंधक डॉ. सेल्वा विनयगम यांनी ही गेल्या 70 वर्षांतील सर्वात मोठी घसरण असल्याचं म्हटलं आहे. रजिस्ट्रारच्या आकडेवारीनुसार, चेन्नईमध्ये जानेवारी 2016 ते जून 2021 दरम्यान सुमारे 3.3 लाख लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 2.6 लाख मृत्यू हे 2019 पूर्वी जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या भागाशी संबंधित आहेत. या 2.6 लाख मृत्यूंपैकी सुमारे 88 हजार लोकांचा कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झाला. सामान्य मृत्यूपेक्षा 25,990 अधिक असल्याचा अंदाज आहे. यात दुसऱ्या लाटेत 17,700 मृत्यूंचाही समावेश आहे.
TOI च्या अहवालानुसार, संपूर्ण साथीच्या काळात चेन्नईमध्ये 8617 मृत्यूची नोंद झाली आहे. या मृत्यूंचा हिशोब वयोमानानुसार केला, तर जसजसे वय वाढत गेले तसतशी मृत्यूची सरासरीही वाढली. 30-39 वयोगटातील प्रति हजार मृत्यूंची सरासरी 0.4 होती, तर 40-49 वयोगटातील हा आकडा 2.26 होता. 60-69 वयोगटात हा आकडा 21.02 वर पोहोचला, तर 70-79 मध्ये त्याचा दर 39.74 वर पोहोचला. 80 आणि त्याहून अधिक वयोगटातील, हा आकडा 96.90 वर पोहोचला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.