नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 284 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं.
कोरोनाचा धोका वाढला असून एकाचवेळी 85 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नैनीतालमधील जवाहर नवोदय विद्यालय गंगरटोक येथील तब्बल 85 विद्यार्थ्यांना एकाचवेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यालयात आतापर्यंत एकूण 96 विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. गेल्या दोन दिवसांत विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या. आरोग्य विभागाने आतापर्यंत एकूण 496 जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आली आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
जवाहर नवोदय विद्यालय गंगरकोटमध्ये आरटीपीसीआर चाचणीद्वारे शालेय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे नमुने गोळा करण्यात आले. दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालात शाळेच्या मुख्याध्यापकांसह सुमारे 11 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर कारवाईत आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाने विशेष शिबिर घेऊन अनेकांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर शनिवारी आलेल्या अहवालात शाळेतील 85 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. पालकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या 24 तासांत 27,553 नवे रुग्ण, धडकी भरवणारा ग्राफ
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,525 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (2 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,81,770 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.