नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. डॉक्टर्स, नर्ससह आरोग्य क्षेत्रातील सर्वच कर्मचारी हे अहोरात्र काम करत असून रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर काही ठिकाणी नातेवाईक डॉक्टरांवरच संताप व्यक्त करताना दिसत आहे. देशातील विविध भागांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये डॉक्टरांवर हल्ला होण्याचे आणि रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच एक प्रकार आता उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये घडला आहे.
एका रुग्णालयामध्ये तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करत या तरुणीचा मृतदेह गाडीत टाकून हे नातेवाईक पसार झाल्याचा भयंकर प्रकार देखील घडला आहे. लखनऊमधील एडव्हान्स न्यूरो अँड जनरल हॉस्पिटलमध्ये सुनील मिश्रा नावाची व्यक्ती आपली पत्नी शैला मिश्रा हिला उपचारांसाठी दाखल करण्यासाठी घेऊन आले होते. शैला यांची परिस्थिती इतकी चिंताजनक होती की त्यांचा सीटी स्कोअर 25 ते 22 दरम्यान आला होता. अशा परिस्थितीमध्ये शैला यांना दाखल करुन घेण्यास आधी नकार दिला. मात्र कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्याच्या नियमांनुसार डॉक्टरांनी शैला यांच्यावर उपचार केले.
25 मे रोजी शैला यांचा मृत्यू झाला. शैला यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन खूप गोंधळ घातला. रुग्णालयातील डॉक्टर, साफसफाई कर्मचारी, नर्सला या नातेवाईकांनी मारहाण केली. रुग्णालयातील रिसेप्शनिस्टसोबतही या लोकांनी वाद घातला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना फोन केला. रग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. पोलीस केवळ उभं राहून घडणारा प्रकार पाहत होते आणि रुग्णाचे नातेवाईक गोंधळ घालत होते असा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजेच एवढ्या गोंधळानंतर नातेवाईक शैला यांचा मृतदेह गाडीमधून स्वत:सोबत घेऊन गेले.
कोरोना नियमांनुसार शैला यांचा मृतदेह सील करण्यात आला नव्हता. मात्र त्यांच्या नातेवाईकांने सर्व नियमांचे उल्लंघन करत मृतदेह घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणात शैला यांच्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. शैला यांच्या नातेवाईकांपैकी अनेकांनी मद्यपान केल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दारुच्या नशेतच या लोकांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. 13 दिवसांनंतर आम्ही पुन्हा मारहाण करण्यासाठी येऊ आणि चौकात नेऊन लटकवू अशी धमकीही या लोकांनी दिल्याचं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.