नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,76,36,307 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,23,144 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2771 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,97,894 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे हाल होत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर तब्बल 21 तास कोरोनाग्रस्ताचा मृतदेह घरातच पडून असल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 58 वर्षीय किशनलाल सोनी यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जवळपास 21 तास त्यांचा मृतदेह हा घरातच पडून होता. किशनलाल यांना एक मुलगा आहे मात्र त्यांची मानसिक प्रकृती ठीक नाही. कोरोनमुळे किशनलाल यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी गावातील कोणीच तयार झालं नाही. काही लोकांनी स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. मात्र प्रशासनाच्या वतीने देखील कोणीच पुढे आले नाही. शेवटी शेजारच्याच काही लोकांनी यासाठी पुढाकार घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, किशनलाल यांची प्रकृती बिघडली होती. याच दरम्यान त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. कोरोना संक्रमित असल्याने कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. किशनलाल यांच्या मुलगा मानसिक रुग्ण असल्याने त्याला आपल्या वडिलांचं कधी निधन झालं हे समजलंच नाही. यामुळे शेजारीच राहणाऱ्या काही लोकांनी मृतदेह स्मशानभूमीत नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयावह! मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना; 90 किमी दूर करावे लागताहेत अंत्यसंस्कार
कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही. मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले आहेत. आग्रा शहरातील लोकांवर आपल्या नातेवाईकांचे मृतदेह तब्बल 90 किलोमीटर दूर अलीगडमध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.