नवी दिल्ली - देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे.
एका रुग्णाला तो निगेटिव्ह असताना देखील कोरोना पॉझिटिव्ह सांगून त्याच्यावर उपचार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चार दिवसांचं तब्बल दोन लाख रुपये बिल दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणाच्या सुपौल जिल्ह्यातील छतरपूर येथील 55 वर्षीय मदन साह यांना पूर्णिया जिल्ह्यातील अल्पना न्यूरो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. मदन यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन यांची आधी कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती.
न्यूरो रुग्णालयाने त्यानंतर आपल्या लॅबमध्ये त्यांची पुन्हा एकदा चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगून त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतलं. चार दिवसांनी मदन यांचा मृत्यू झाल्यावर रुग्णालयाने त्यांना तब्बल दोन लाखांचं बिल दिलं. तसेच 15 हजारांची चार रेमडेसिवीर इंजेक्शन ही रुग्णाला देण्यात आली होती. नातेवाईकांनी 1.60 लाखांचं बिल भरलं. मात्र 40 हजार आणखी दिले जात नाहीत तोपर्यंत डेथ सर्टिफिकेट देणार नसल्याचं रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह
एका रुग्णालयाने कोरोना रुग्णाला तब्बल 19 लाखांचं बिल दिलं आणि 8 लाख दिल्यानंतर देखील मृतदेह देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण बिल न दिल्यामुळे रुग्णाचा मृतदेह देणार नसल्याचं खासगी रुग्णालयाने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव येथील अनिल कुमार यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. लखनऊच्या टेंडर पाम रुग्णालयात अनिल यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर खासगी रुग्णालयाने तब्बल 19 लाखांचं बिल दिलं. अनिल यांनी आठ लाख रुपयांचं बिल भरलं. मात्र बाकीचं बिल अद्याप भरलेलं नाही. त्यामुळे रुग्णालयाने त्यांच्या पत्नीचा मृतदेह देण्यास नकार दिला आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मृतदेह मागितला असल्यास रुग्णालयाने माझ्याकडे आणखी 10.75 लाख मागितले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही अशी माहिती अनिल यांनी दिली आहे.