नवी दिल्ली - देशात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,22,193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी मद्रास येथे कोरोनाच्या विस्फोट झाला आहे. तब्बल 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी राज्य लसीकरण केंद्रावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आहे, असं म्हटलं आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासमध्ये कोरोनाचे 55 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी शनिवारी चेन्नईतील लसीकरण केंद्राला भेट दिली आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. राधाकृष्णन म्हणाले की, 1,420 लोकांपैकी 55 लोकांना आतापर्यंत आयसोलेट करण्यात आले आहे. ही सर्व कोविड-19 ची अत्यंत सौम्य प्रकरणे आहेत. कॅम्पसमध्ये आधीच उपलब्ध असलेल्या आयसोलेशन सुविधेचा प्रशासन प्रभावीपणे वापर करत आहे.
राधाकृष्णन यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपर्यंत आयआयटी-एममध्ये एकूण संसर्गाची संख्या 30 होती. पण आता प्रकरणांची संख्या 55 वर पोहोचली आहे. नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. आशा आहे की विश्लेषणाचे परिणाम 2-3 आठवड्यांत येतील. फेस मास्कवरील निर्बंधांबद्दल विचारले असता ते म्हणाले, "तामिळनाडूने कधीही मास्कची आवश्यकता मागे घेतली नाही. फक्त दंड आकारण्याची प्रक्रिया मंदावली होती, जी आम्ही पुन्हा लागू केली आहे. 93 टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्यात आला आहे आणि 77 टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे."
आरोग्य सचिव म्हणाले, "जे बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्यांना ते मिळण्यास सुरुवात झाली पाहिजे. म्हणून, आम्ही एक विशेष मोहीम राबवत आहोत, ज्याचे निरीक्षण स्वतः मुख्यमंत्री एमके स्टॅलिन करतील. राज्याने वैद्यकीय पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात सुधारल्या आहेत. 2,099 खूप इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेज अंतर्गत उच्च दर्जाचे आयसीयू बेड्स तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.” एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.