नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,94,720 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 442 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या एकूण संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा काढला आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एकूण रुग्णांचा आकडा आता 4,868 वर पोहोचलं आहे. याच दरम्यान अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. असं असतानाच आता भाजपा मुख्यालयात कोरोना विस्फोट झाला आहे. 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली मुख्यालयातील 42 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱी यांच्यासह माध्यम विभागात करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्वजण सध्या विलगीकरणात असून कोरोना नियमांचं पालन करत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे कालच या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक झाली होती. कार्यालयाचं सॅनिटायझेशन करण्यात आलं असून दररोज कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक कामांसाठीच कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आगामी उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक कार्यालयात झाली होती. या बैठकीची दुसरी फेरी आज होणार होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असताना कोरोनाचं हलकं इन्फेक्शन हे घातकं ठरू शकतं. छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर देखील बेतू शकतं. सध्या कोरोनाचा धोका वाढल्याने वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे.