नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत होता. तसेच देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 38,667 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 478 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4,30,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा आता समोर आला आहे. डेल्टा प्लसचा एक रुग्ण बेपत्ता झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या ऊधमसिंह नगर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला आहे. डेल्टा प्लसचा रुग्ण बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांची मदत घेतली आहे. रुग्णाचा फोन गेल्या दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचण येत आहे. जवाहरलाल लाल नेहरु रुग्णालयात संजय सिंह नावाचा एक तरुण आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी आला होता. बाहेरच्या राज्यातून आल्यामुळे डेल्टा प्लससाठी तिचे सँपल पाठवण्यात आले. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला.
10 ऑगस्टला डेल्टा रिपोर्ट आल्यावर रुग्णाला डेल्टा प्लसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तरुणाला डेल्टाची लागण झाल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाचा शोध नाही लागला म्हणून सीएमओ कार्यालयाच्या वतीने एसएसपींना एक पत्र पाठवलं आणि तरुणाचा शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून तरुणाचा मोबाईल नंबर बंद आहे. रुग्णाचा शोध लागला नाही तर डेल्टा प्लसचा अत्यंत वेगाने प्रसार होण्याचा धोका आहे. म्हणूच पोलीस या प्रकरणाचा अधिक वेगाने तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (14 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. तसेच देशाचा पॉझिटिव्ही रेट 2.05 टक्क्यांवर आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,87,673 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,13,38,088 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत तब्बल 53.61 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे.