नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,77,29,247 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,73,790 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,617 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,22,512 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना संक्रमणादरम्यान करोना चाचणी करण्याची एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. नव्या 'सलाईन गार्गल आरटी-पीसीआर' पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना फक्त तीन तासांत या कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळू शकेल.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसहीत एका नवा टप्पा गाठला आहे. ICMR कडून NEERI च्या आपल्या टीमला देशभरातील लॅबमध्ये या नव्या पद्धतीची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. सलाईन गार्गल आरटी-पीसीआर या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य 'कलेक्शन ट्यूब'मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. एका विशिष्ट तापमानात, NEERI कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो.
सोल्युशन गरम केल्यानंतर एका 'RNA' टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशनवर 'आरटी-पीसीआर' प्रक्रिया केली जाते. 'नीरी'चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडतं. लोक स्वतःहून कोरोना संसर्गाची चाचणी करू शकतील कारण ही प्रक्रिया 'सेल्फ सॅम्पलिंग'ला परवानगी देते. यासाठी चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभं राहण्याची गरज लागणार नाही. यामुळे बराचसा वेळही वाचतो.
नव्या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसंच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असंही डॉ. खैरनार यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे नाकातून स्वॅब घेण्यासाठी अधिक वेळ लागतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र असं असताना मृतांच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत असताना मृतांचा आकडा वाढत असल्यामागचं नेमकं कारण आता तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना आकडेवारीनुसार, 9 मे नंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्या कमी होत आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय घट पण मृतांचा आकडा धडकी भरवणारा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण
कोरोना मृतांच्या आकड्यामध्ये मात्र कोणताच फरक पाहायला मिळत नाही. कोरोनामुळे जवळपास चार हजारहून अधिक लोकांना दररोज आपला जीव गमवाव लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. चंद्रकांच लहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्येत कमी पाहायला मिळत असली तरी मृतांच्या आकड्यावर याचा परिणाम हा 14 दिवसांनंतर पाहायला मिळेल. संसर्गाचे हे एक चक्र आहे. दुसऱ्या देशामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये देखील काही दिवसांनी कोरोना मृतांच्या संख्येत घट झाली आहे. 9 मे पासून भारतात कोरोनाचा ग्राफ खाली येत असलेला पाहायला मिळत असल्याचं लहारिया यांनी म्हटलं आहे.