नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे.
कोरोनामुळे एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या देवासमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली. देवासच्या अग्रवाल समाजाचे अध्यक्ष बालकिशन गर्ग यांची पत्नी आणि दोन मुलांचं कोरोनामुळे निधन झालं. मात्र कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू सहन न झाल्याने छोट्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने पर्सरात खळबळ उडाली आहे.
बालकिशन गर्ग यांच्या पत्नी चंद्रकला यांचं कोरोनामुळे 14 एप्रिल रोजी निधन झालं. त्यानंतर दोन दिवसांनी मुलगा संजय आणि स्वपनेश यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील सदस्यांच्या मृत्यूने रेखा यांना मोठा धक्का बसला होता. याच धक्क्यामध्ये त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे आठवड्याभरात हे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनामुळे कुटुंब उद्ध्वस्त! घरात लेकीच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई-वडिलांची निघाली अंत्ययात्रा
घरामध्ये लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बरेलीमध्ये एका प्रोफेसर आणि त्यांच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मन सुन्न करणारी बाब म्हणजे त्यांच्या मुलीचं 2 मे रोजी लग्न होतं. मुलीचं लग्न असल्याने आई-वडील खूप खूश होते. पण त्याआधीचं त्यांचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या घरातून अंत्ययात्रा निघाल्या आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.