नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एक लाख 84 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कुंभमेळा (Kumbh Mela 2021) हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान आता हरिद्वारमध्ये फक्त दोन दिवसांत एक हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 594 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर सोमवारी हरिद्वारमध्ये 408 रुग्ण आढळले होते. कुंभमेळ्यातील शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 2812 वर पोहोचली आहे. सोमवती अमावस्येच्या पर्वावर होणाऱ्या महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.
शाहीस्नानासाठी आलेल्या अनेक आखाड्यांतील साधू-संत आणि महंतांना कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. प्रशासनाला गर्दी नियंत्रित करण्यात अपयश येत असून कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्यात पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. याच दरम्यान महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर 102 साधू व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळत आहे. हरिद्वारमध्ये लाखो साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 ते सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 18,169 भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल 102 साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल 102 जण पॉझिटिव्ह, परिस्थिती गंभीर
शाहीस्नानापूर्वी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासह अनेक संतांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी महाराज यांचीही प्रकृती खालावली आहे. रविवारपासून 10 हून अधिक संत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व संतांना शाहीस्नान करता आले नाही. हरिद्वारला येण्यापूर्वी भाविकांनी कोरोना नसल्याचा रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले होते. हरिद्वारमध्येही दररोज 50 हजार जणांची चाचणी करण्यात येत आहे.