नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे एक हसतं-खेळतं घर काही दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. 7 दिवसांत तब्बल 17 लाख खर्च करूनही एका चिमुकल्यापासून कोरोनाने त्याचे आई-बाबा हिरावले आहेत.
कोरोनाच्या विळख्यात अख्ख कुटुंब सापडलं. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी जायसवाल कुटुंबातील दाम्पत्याला आणि त्यांच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारासाठी लाखोंचा खर्च करण्यात आला. मात्र तरी देखील कोरोनाने चिमुकल्यांपासून त्यांचे आईवडील कायमचेच हिरावले आहेत. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या आई-बाबांना मुखाग्नी दिला आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहपूर क्षेत्रातील शताब्दीपूरम कॉलनीतील 37 वर्षीय अजय जायसवाल आणि त्यांची 35 वर्षीय पत्नी अंशिका काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी त्यांची सहा वर्षांची मुलगी गुनगुन आणि दीड वर्षांचा मुलगा आनंदही कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण प्रकृती आणखी गंभीर झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
रुग्णालयातील उपचारादरम्यान 7 दिवसांत तब्बल 17 लाख रुपये खर्च केले. पण काहीच फायदा झाला नाही. लाखो रुपये खर्च करूनही कोरानामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाला. चिमुकल्यांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यानेच आपल्या आईबाबांना मुखाग्नी दिल्याने साऱ्यांचेच डोळे पाणावले आहे. कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती गंभीर होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.