नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कुंभमेळा (Kumbh Mela 2021) हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान हरिद्वारमध्ये फक्त दोन दिवसांत एक हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुंभमेळ्यात सामील झाल्यानंतर प़ॉझिटिव्ह आलेले 19 भाविक रुग्णालयातून पळाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रशासन आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेपासून प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील 19 भाविक हे हरिद्वारमधील कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यातले काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. उपचारासाठी त्यांना टिहरी जिल्ह्यातील रुग्णालात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचदरम्यान पॉझिटिव्ह भाविक हे रुग्णालयातून पळून गेले. राजस्थान सरकारला याबाबत माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोमवती अमावस्येच्या पर्वावर होणाऱ्या महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus 2nd Wave) कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. पुढील तीन आठवडे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं म्हणत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे. सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे तीन आठवडे भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यादरम्यान लोकांना कोरोनाचे नियम हे पाळावे लागतील. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर मिश्रा यांनी रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि लसीची कमतरता कायम राहिल्यास देशात भयंकर स्थिती उद्भवेल. त्यामुळे पुढचे तीन आठवडे देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत.