नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,17,532 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 491 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 9,287 वर पोहोचली आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोविड-19 च्या ताज्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पॉझिटिव्ही दर देखील 30% पेक्षा कमी झाला आहे. मात्र कोरोना मृतांचा आकडा अजूनही उच्च स्तरावर असून तो चिंताजनक आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकार मृत रुग्णांकडून गोळा केलेल्या नमुन्यांची जीनोम सिक्वेंसिंग घेत आहे. त्यांना ओमायक्रॉन किंवा डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे की नाही हे शोधण्यासाठी ही चाचणी केली जात आहे. दिल्लीत बुधवारी 35 मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या 353 वर पोहोचली आहे. गेल्या 10 दिवसांत कोरोनाची लागण होऊन 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात नोंदलेल्या मृत्यूची संख्या दुप्पट आहे. दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये वाढ आणि मृत्यूदर यामध्ये तफावत आहे. त्यामुळे मृत व्यक्तींना ओमायक्रॉन की डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेस आणि लोक नायक हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत कोविड-19 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केली जात आहे. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रिपोर्ट लवकरच अपेक्षित आहे. त्याचवेळी एका अधिकाऱ्याने, कोविड-पॉझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की त्यांच्यापैकी बहुतेकांची परिस्थिती गंभीर होती. ओमायक्रॉनचं माइल्ड नेचर असूनही तो अत्यंत वेगाने पसरत आहे असं म्हटलं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात, 1,553 नमुन्यांचा जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले. त्यापैकी सुमारे 34% डेल्टा प्रकाराचे होते, 430 (28%) ओमायक्रॉनचे होते आणि बाकीचे इतर स्ट्रेनचे होते. 1 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान विश्लेषित केलेल्या 511 नमुन्यांपैकी 402 किंवा सुमारे 79% ओमायक्रॉन व्हेरिएंट होते. आतापर्यंत ओमायक्रॉनमुळे मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.