नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,73,13,163 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,52,991 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2812 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,95,123 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरणा वेगाने सुरू आहे. याच दरम्यान दिल्ली सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस (Corona Vaccine) देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. दिल्ली सरकारने 1.34 कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. 1 मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी मागणी त्यांनी केली. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, 150 रुपये फायदा होतो. मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही केजरीवालांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचना केली आहे.
देशात एक मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेकनं लसींचे दर निश्चित केले आहेत. यात कोविशील्ड राज्य सरकारला 400 रुपये, खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत मिळणार आहे. तर कोवॅक्सिन राज्य सरकारला 600 रुपये, खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांत मिळणार आहे. दूसरीकडे ही लस केंद्र सरकारला 150 रुपयांत दिली जाणार आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा भयावह वेग! मे महिन्यात देशात दररोज होऊ शकतात 5000 मृत्यू; रिसर्चमधून तज्ज्ञांचा गंभीर इशारा
कोरोनामुळे काही ठिकाणी भीषण चित्र निर्माण झालं आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज 5 हजारांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक करोना मृत्यूची नोंद होत असताना संशोधनातून ही माहिती आता समोर आली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल असं म्हटलं आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात कोरोना मृतांची संख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गंभीर परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.