नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही दोन कोटींच्या वर गेली आहे. तर देशभरातील अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच वेळी बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मात्र याच दरम्यान अनेकांनी कोरोनाच्या या कठीण काळात इतरांना मदतीचा हात दिला आहे. गरजुंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका छोट्या मिठाईवाल्याने 250 कोरोना रुग्णांच्या मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.
संदीप शर्मा असं या व्यक्तीचं नाव असून ते दिल्लीतील (Delhi) सीताराम बाजार परिसरात राहतात. ते कोरोनाच्या संकटात गरीब रुग्णांना मदत करत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयातील 250 कोरोना रुग्णांना मोफत जेवण पाठवतात. तसेच इतरांना देखील गरीबांना काही मदत करता आली तर नक्की करा असं आवर्जून सांगतात. संदीप यांनी लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामधील मजकूर वाचून सर्वच जण भावूक झाले आहेत. सर्व जण संदीप शर्मा यांच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत.
संदीप शर्मा यांनी लिहिलेलं पत्र प्रवीण स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलं आहे. तसेच "सीताराम बाजार येथील एक छोटा मिठाईवाला संदीप शर्मा यांचे हे पत्र आहे. हे शर्मा उत्तर दिल्लीतील एका रुग्णालयातील 250 कोरोना रुग्णांना जेवण पाठवतात. तुम्हाला त्यांना काही मदत करता आली तर नक्की करा. कारण ते काही श्रीमंत नाहीत, पण आपल्यापरीनं जे जमेल ते करीत आहेत" असं देखील म्हटलं आहे.
शर्मा यांनी आपल्या पत्रात काही वस्तुंची यादी आहे आणि शेवटी एक ओळ लिहिली आहे. बाकी मॅडम तुम्ही बघून घ्या, तुम्ही जे पैसे द्याल त्यात मी तुमची सेवा करेन असं म्हटलं आहे. अनेकांनी संदीप यांना मदत करण्याची इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तसेच त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.