नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दीड कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी देखील रांगा लागल्या आहे. स्मशानभूमीतही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता स्मशानभूमीत लाकडाची कमतरता भासू लागल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच लाकडाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वन विभागाकडे यासाठी मदत मागण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाकडांची व्यवस्था करण्यासाठी पालिकेच्या एजन्सींनी राज्य वन विभागाकडे संपर्क साधला आहे. लाकडांची समस्या दूर करण्यासाठी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुकलेल्या गोवऱ्यांचा वापर इंधन म्हणून करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी असलेल्या निगमबोध स्मशानभूमीत दररोज 6,000-8,000 किलो लाकडांची आवश्यकता भासत होती. परंतु, दुसऱ्या लाटेदरम्यान ही मागणी प्रत्येक दिवसाला जवळपास 80,000-90,000 किलो लाकडांपर्यंत पोहचली आहे.
उत्तर एमसीडीचे महापौर जय प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मशानभूमी घाटातील लाकडी साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेला पार्किंग आणि पार्कमध्ये स्मशानभूमीची सुविधा करावी लागेल. त्याचबरोबर लाकडाची गरजही बरीच वाढली आहे, म्हणून दिवसभर लाकडाची मागणी पूर्ण करण्यासाठी दिल्ली सरकारच्या सहकार्याची गरज आहे. शहराच्या वनविभागाने सांगितले की त्या इमारती लाकडांसाठी पालिका यंत्रणांकडून विनंत्या आल्या आहेत.
उपवनसंरक्षक आदित्य मदनपोत्रा यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी क्षेत्र परिवहन कॉर्पोरेशनला दिल्लीत प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली तयार करण्यास परवानगी दिली आहे, जेणेकरून आता कमीतकमी 500 झाडांच्या लाकडाचा वापर होऊ शकेल. त्याचवेळी एसडीएमसीने दिल्ली सरकारला शेजारील राज्यांकडून लाकडाचा पुरवठा शहरात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता करता येईल याची काळजी घेण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.