नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,91,83,121 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 94,052 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6148 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,59,676 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या नियमानुसार कोरोना संसर्ग झालेल्या मुलांवर सिटी स्कॅनचा उपयोग हा समजदारीने करावा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने (DGHS)या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एसिम्पटोमॅटिक आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉईडचा वापर हा घातक असल्याचं म्हटलं आहे. 18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे असं म्हटलं आहे. रुग्णालयामध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे.
लहान मुलांसाठी 6 मिनिटांच्या वॉक टेस्टची सूचना करण्यात आली आहे. 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांची पालकांच्या देखरेखीखाली 6 मिनिटांची वॉक टेस्ट करावी. वॉक टेस्टमध्ये मुलाच्या बोटांना ऑक्सिमीटर लावून त्याला सलग 6 मिनिटं चालण्यास सांगावं. यानंतर ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल आणि पल्स रेट मोजावी. यामुळे हायपोक्सियाचे निदान होईल, असं मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. तसेच सौम्य लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामोल (10-15 MG) देता येऊ शकते. कफ असल्यास मोठ्या मुलांनी गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं निघाली कोरोना संक्रमित; रिपोर्टमधून धडकी भरवणारा खुलासा
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कोरोना लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं कोरोना संक्रमित असल्याची माहिती समोर आली आहे. लहान मुलांना लवकरात लवकर लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात चिमुकल्यांवर कोरोना लसीची ट्रायल सुरू होणार आहे. पण त्याआधीच याआधीच एम्सने (AIIMS) एक धक्कादायक खुलासा केला आहे. एम्समध्ये ज्या लहान मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलआधी अशी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती आता स्क्रिनिंगमधून समोर आली. मुलांच्या पालकांनाही मुलांना कोरोना झाल्याची कल्पना नव्हती. या सर्व मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात संसर्ग, घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणं नव्हती. तर केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.