नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांचा आकडा दोन कोटींवर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.
बिहारच्या जगदीशपूरमध्ये ही घटना घडली आहे. ममता देवी असं या 50 वर्षीय महिलेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी यानंतर पाठ फिरवली. मृतदेह ओळखण्यास देखील नकार दिला. यामुळेच प्रशासनावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. महिलेच्या मृत्यूची तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट आपला संबंधच नसल्याचं सांगितलं.
ममता देवी दुल्हिनगंजमध्ये आपल्या नातेवाईकांकडे राहत होत्या. याच वेळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जगदीशपूरयेथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे नातेवाईक निघून गेले. उपचारादरम्यान ममता यांना मृत्यू झाला. कोरोना रुग्णालयात दाखल करताना महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांचा फोन नंबर होता. त्यावर फोन करून मृत्यूची माहिती दिली असता, नातेवाईकांनी ओळख दाखवण्यास तसेच मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर प्रशासनानेच महिलेवर अंत्यसंस्कार केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! रुग्णालयाने कोरोना मृतांचा आकडा लपवला; 19 दिवसांत तब्बल 65 जणांच्या मृत्यूने खळबळ
देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एका खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 19 दिवसांत तब्बल 65 रुग्णांचा मृत्यू झाला मात्र रुग्णालयाने हे महत्त्वाची माहिती लपवून ठेवल्याचं समोर आलं आहे. आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वार येथील बाबा बर्फानी रुग्णालय प्रशासनाने कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची नेमकी माहिती आरोग्य विभागाला दिलेली नाही. कोरोना रुग्णाच्या मृत्यूची सूचना ही 24 तासांच्या आत राज्याच्या कोविड कंट्रोल रुमला देण्याचे निर्देश सरकारच्या वतीने कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना देण्यात आले आहेत. बाबा बर्फानी रुग्णालयात 25 एप्रिल ते 12 मे पर्यंत उपचारादरम्यान 65 रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे.