नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,007 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिल्ली-एनसीआरच्या शाळांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून एनसीआरच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या 72 तासांत कोरोनाचे 35 रुग्ण आढळले आहेत. बुधवारी गाझियाबाद आणि नोएडाच्या शाळांमध्ये कोरोना संसर्गाची 12 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याची प्रकरणे चिंता वाढवत आहेत. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, आरोग्य विभागाने नोएडा आणि गाझियाबादमधील शाळांमध्ये आणखी 12 नवीन कोरोना प्रकरणांची पुष्टी केली असून, गेल्या 72 तासांत एनसीआर जिल्ह्यातील एकूण प्रकरणांची संख्या 35 झाली आहे. घरी आणखी विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा केला जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. इतकेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आहेत, परंतु त्यांची कोरोना चाचणी झालेली नाही.
एनसीआरच्या शाळांमध्ये सोमवारपासून आतापर्यंत कोरोनाची 35 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. नोएडामध्ये 24 विद्यार्थी आणि तीन शिक्षकांसह 27 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी गाझियाबादमधून आठ जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सात विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. शिव नगर शाळा नोएडा आणि डीपीएस इंद्रपुरममध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
शाळांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता शाळा बंद करण्यात येत असून पुन्हा एकदा वर्ग ऑनलाइन घेतले जात आहेत. बाधित विद्यार्थ्यांना विलग करण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विविध शाळांमध्ये काम केले जात आहे. एवढेच नाही तर शाळेच्या परिसरात काळजी घेतली जात असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.