नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान कोरोना संकटातील एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचार करण्यास थेट नकार दिला आहे. या नकारामुळे एका प्राध्यापिकेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
इंद्राणी बॅनर्जी असं या प्राध्यापिकेचं नाव असून त्या या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांच्या काही सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने त्यांना योग्य रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झाल्य़ाची घटना समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी इंद्राणी बॅनर्जी यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
शुक्रवारी त्यांना गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण यावेळी रुग्णालयात जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे इंद्राणी यांना गांधीनगरमधील एका खासगी रुग्णालयात नेण्याची विनंती केली. खासगी रुग्णालयानेही आपल्याकडे व्हेंटिलेटर तसेच इतर सुविधा नसल्याचं सांगितलं. त्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांनी बॅनर्जी यांना खासगी वाहनातून अहमदाबाद पालिकेच्या कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने EMRI 108 रुग्णवाहिकेतून आणलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. यानंतर त्यांना पुन्हा गांधीनगरमधील रुग्णालयात आणण्यात आलं. पण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी खूपच खालावली होती.
वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,61,736 नवे रुग्ण, 879 जणांचा मृत्यू
जेव्हा रुग्णालयाने इंद्राणी बॅनर्जींसाठी BiPAP ऑक्सिजन मशीनची व्यवस्था केली तोपर्यंत उशीर झाला होता. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (13 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1,61,736 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 71 हजारांवर पोहोचला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
बापरे! अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन, प्रकृती चिंताजनक
अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या सूरतमधील बाळाला कोरोनाची लागण झाली असून ती चिमुकली सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, 11 दिवसांची एक चिमुकली आपल्या जन्माच्या पाचव्या दिवसापासून कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. नवजात बाळ आईच्या संपर्कात आल्याने कोरोना संक्रमित झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. अमरोली भागातील एका 30 वर्षीय महिलेला 1 एप्रिल रोजी डिलिव्हरीसाठी डायमंड रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी महिलेने चिमुकलीला जन्म दिला.