नवी दिल्ली - देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,15,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 630 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,66,177 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील एकंदरीत कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. हर्षवर्धन यांनी देशात परिस्थिती नियंत्रणात असून, अनेक त्रुटी दाखवून दिल्या. तसेच "महाराष्ट्राच्या सरकारच्या उदासीनतेमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाच्या प्रयत्नांचं चाक रुतलं. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून मी गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारचा सावळागोंधळ आणि बेजबाबदारपणा पाहतोय. लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचा मुद्दा स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे, त्यात अजिबात तथ्य नाही!" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
"आरोग्य कर्मचारी असो की फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण महाराष्ट्र सरकारची कामगिरी फार काही कौतुकास्पद राहिलेली नाही. महाराष्ट्र सरकार नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण (क्वारंटाइन) करण्याचे सोडून खंडणीच्या वसुलीत गुंतलं आहे, हे अतिशय धक्कादायक आहे" अशी जोरदार टीका देखील हर्षवर्धन यांनी केली आहे. तसेच छत्तीसगडमधील नेते चुकीची माहिती पसरवत असून लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. छत्तीसगड सरकारने अशा परिस्थितीत गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा आपल्या राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर द्यावा असं म्हटलं आहे.
बापरे! कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही तब्बल 40 डॉक्टर्स पॉझिटिव्ह; परिस्थिती गंभीर
बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचे कारण असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद करत कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी देशाचा रिकव्हरी रेट 92.38 असून मृत्यूदर 1.30 टक्के असल्याचे ते म्हणाले. सर्व गोष्टी पुन्हा सुरू झाल्या असून, लोकांचे निष्काळजीपणे वागणे चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यात देशातील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. एक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याकडे खूप ज्ञान आहे, पण अद्यापही अनेक त्रुटी आहेत. पण मला वाटते सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आहे. याआधी असलेले धोरण आपण नीट राबवले, तर संख्या कमी होईल, असा विश्वास हर्षवर्धन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.