नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केल्याची घटना समोर आली आहे. तसेच मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून फोन देखील करण्यात आला. मात्र जेव्हा कुटुंबीयांनी मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण तो त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेहच नव्हता. यानंतर रुग्णालयात रुग्णाला शोधलं असता तो जिवंत असल्याची माहिती मिळाली आहे. या गंभीर प्रकरणानंतर रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 65 वर्षीय महिलेला 18 एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रात्री आठ वाजता रुग्णालयातून महिलेच्या नातेवाईकांना तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह घेऊन जा असं सांगण्यात आलं. नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मात्र पाहिल्यावर त्यांना हा दुसऱ्याच महिलेचा मृतदेह असल्याचं समजलं. त्यांनी तातडीने आपल्या रुग्णाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
रुग्णालयात या घटनेने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी आपल्या रुग्णाचा शोध घेतला असता. त्यांना त्या जिवंत असल्याचं आढळून आलं. तसेच महिलेला सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे.