नवी दिल्ली - देश कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 3,07,09,557 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,892 नवे रुग्ण आढळून आले असून 817 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,05,028 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ब्लॅक फंगसनेही थैमान घातले आहे. यामध्ये अनेकांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली आहेत. उपचारादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला आहे. असं असताना एक सकारात्मक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मृत्यूवर मात केली आहे. कोरोना, ब्लॅक फंगस, ऑर्गन फेलसह इतरही आजारांविरोधातील लढाई ते यशस्वीरित्या जिंकली आहे.
तब्बल 85 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी गंभीर आजारावर मात केली आहे. भरत पांचाळ असं या 54 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते मुंबईचे रहिवासी आहेत. आजारांविरोधातील त्यांची ही लढाई अत्यंत कठीण होती. तब्बल 85 दिवसांनंतर म्हणजेच जवळपास तीन महिन्यांनंतर त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, पांचाळ यांनी कोरोना, ब्लॅक फंगसची लागण झाली होता. तसेच त्याचे ऑर्गन देखील फेल झाले होते. कोरोना संक्रमणामुळे त्यांची किडनी, लिव्हर आणि फुफ्फुस काम करायचं बंद झाले होते.
मल्टी ऑर्गन फेल्यूअर आणि ब्लॅक फंगसचा देखील त्यांना सामना करावा लागला. जवळपास 70 दिवस ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. डॉक्टरांनी गेल्या 15 दिवसांत इतक्या गंभीर समस्या असलेला पहिला रुग्णा पाहिल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर रेमडेसिवीरपासून प्लाझ्मा थेरपी आणि इतरही उपचार केला मात्र त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. डॉक्टरांची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर भरत पांचाळ हे बरे झाले आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे आणि तब्बल 85 दिवसांनी त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"जग कोरोनामुळे धोकादायक परिस्थितीत, तब्बल 40 लाख बळी"; WHO ने दिला गंभीर इशारा
जगभरातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक कोटींहून अधिक आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतच गंभीर इशारा दिला आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. काही देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषणा केली आहे. तर काही देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहेत. याच दरम्यान WHO ने जगभरात कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असल्याची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रसस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जग कोरोनामुळे धोकादायक परिस्थितीत आहे. जगात कोरोनामुळे आतापर्यंत 40 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही देशांमध्ये जेथे कोरोना लसीकरण जलदगतीने केले गेले आहे, त्यांना असे वाटू लागले की रोगराई पूर्णपणे संपली आहे. तर कमी लसीकरण झालेल्या देशांमध्ये पुन्हा कोरोनाचे प्रकार वाढत आहेत असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.