नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,48,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,04,099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,93,82,642 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाची दुसरी लाट ही जास्त खतरनाक असून त्यांचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याचं आता समोर आलं आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचं दिसत असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याचं कारण सांगितलं आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचं प्रमाण वाढलं असावं असं आयसीएमआरने म्हटलं आहे. तरुणांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी माहिती दिली आहे. "पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यामध्ये वयात जास्त फरक असल्याचं दिसत नाही. प्रतिकूल परिणामासाठी 40 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात" असं म्हटलं आहे.
भार्गव यांनी "तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण थोडं वाढल्याचं दिसत आहे, कारण अचानक त्यांना घऱाबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशात कोरोनाच्या व्हायरचा नवा प्रकार आढळत असून त्याचाही परिणाम झालेला असू शकतो" असं म्हटलं आहे. कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, आणि अरुणाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.
आशेचा किरण! महाराष्ट्र, दिल्लीसह 18 राज्यांत कमी होतोय कोरोनाचा कहर पण 'या' राज्यांमुळे चिंतेत भर
देशातील 13 राज्यांमध्ये 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 6 राज्यांमध्ये 50 ते 1 लाखांवर सक्रिय रुग्ण आहेत. आणि 17 राज्यांमध्ये 50 हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने देशाचा पॉझिटिव्हिटी दर हा कमी होत असल्याचे संकेत आहेत. हा दर आता 21 टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली. 27 एप्रिलपासून देशाच्या पॉझिटिव्हिटी दरात घट दिसून येत आहे. देशातील 734 जिल्ह्यांपैकी 310 जिल्ह्यांमध्ये अजूनही पॉझिटिव्हिटी दर हा 42 टक्क्यांवर आहे. पण देशाचा एकूण सरासरी दर हा आता 21 टक्क्यांवर आला आहे, असं भार्गव म्हणाले.