नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1,761 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,30,07,841 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5,16,479 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (20 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एक हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. 127 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 26,240 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4,24,65,122 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर देशात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे.
ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?
ओमायक्रॉन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तो झपाट्याने पसरला, परंतु रुग्णाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. नवीन प्रकाराबद्दल अजून जास्त माहिती नाही, पण तो ओमायक्रॉनमधूनच बाहेर आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की या प्रकारावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण तो चाचणीमध्ये कमी उपलब्ध आहे. याशिवाय, जगभरातील घट होणाऱ्या केसेसबद्दल चाचणी कमी झाली आहे आणि त्यामुळे कमी केसेस दिसत आहेत असं म्हटलं आहे. नवीन व्हेरिएंट श्वसनसंस्थेच्या फक्त वरच्या भागावर परिणाम करतो. म्हणजे तो फुफ्फुसापर्यंत पोहोचत नाही आणि घशापर्यंतच मर्यादित राहते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टिल्थ व्हेरिएंट्सचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये चक्कर येणे, अशक्तपणा आणि थकवा ही लक्षणे दिसतात.
व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणे दिसतात. याशिवाय ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे आणि हृदयाचे ठोके जलद होणे ही त्याची लक्षणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओमायक्रॉन व्हायरसमुळे कोरोनाची नवीन लाट येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण पूर्व युरोपमध्ये आढळून आलेले आहेत. त्यामुळेच अर्मेनिया, अरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, युक्रेन आणि रशियात करोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. हाँगकाँग, दक्षिण कोरिया या देशांमध्येही कोरोना रुग्ण वाढलेले दिसून येतात. दुसरीकडे, जूनपर्यंत कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे, असे आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते.