नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज तीन हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (8 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,451 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,24,064 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना कोरोना मृतांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. पण पुन्हा रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकड्यात वाढ होत असल्याने चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.74 टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 0.83 टक्के आहे. लसीकरण मोहिम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. काही लोकांना या व्हायरसमुळे गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. तर काही लोकांमध्ये याची फक्त सौम्य लक्षणं दिसतात. कोणतंही लक्षण नसलेले लोक इतरांना सहज संक्रमित करू शकतात.कोरोनाची लक्षणं नसलेली एखादी व्यक्ती कोरोना कॅरियर आहे की नाही ते कसं शोधायचं हे जाणून घेऊया. काही लोकांमध्ये विविध कारणांमुळे कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. तरुणांची रोग प्रतिकारशक्ती ज्येष्ठांपेक्षा अधिक चांगली असल्यामुळे तरुणांमध्ये ज्येष्ठांपेक्षा सौम्य लक्षणं दिसतात.
लक्षणं दिसत नसतानाही असू शकते कोरोनाची लागण; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कसं?
ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असं दिसून आलंय की विशेषत: 6 ते 13 वयोगटातील मुलांना कोरोनाची लक्षणं नसतात. कारण त्यांना श्वसनासंबंधी विषाणूजन्य आजार होण्याची अधिक शक्यता असते. जेव्हा या वयातील मुलांना कोरोना होतो तेव्हा ते कमी धोकादायक असते. याशिवाय, रोगाची गंभीरता ही एखाद्या व्यक्तीच्या लसीकरण स्थितीवर आणि तीव्र संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. ताप, कफ, वास न येणे, चव न लागणे, सर्दी, थकवा जाणवणे, डोकेदुखी, श्वासोच्छवासाची समस्या, स्नायू किंवा शरीर दुखणे, घसा खवखवणे, उलट्या होणे, अतिसार, त्वचेवर पुरळ उठणे, डोळ्यात जळजळ आणि लालसरपणा, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही अनेक कोरोना रुग्णांना जाणवत आहेत.