नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत होता. रुग्णांच्या संख्येत घट होत होती. पण आता देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील सातत्याने वाढत आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर येत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे सात हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,31,97,522 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5,24,723 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (9 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,240 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला आहे.
भारतातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने 32 हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागे ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 असल्याचं म्हटलं जात आहे. सात जूनला चार हजार, आठ जूनला पाच हजारांहून अधिक आणि आता सात हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा ग्राफ सतत वाढत आहे.
हिंदुस्तान टाईम्सनुसार, महाराष्ट्रातील सर्विलान्स अधिकारी आणि महामारी तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत कोरोनाचा पूर्णपणे नवीन प्रकार येत नाही तोपर्यंत चौथी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. सध्या वाढणारी कोरोना प्रकरणे ही तिसरी लाट आणणाऱ्या ओमायक्रॉनचे सर्व प्रकार आहेत. पुढील काही आठवडे केसेस वाढतील, मात्र नंतर ते कमी होऊ लागतील. राज्य कोविड टास्क फोर्सचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी एचटीला दिलेल्या माहितीनुसार, सध्या बहुतेक प्रकरणे अतिशय सौम्य आहेत. याला चौथी लाट म्हणणं खूप घाईचे आहे.