नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 13 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटीच्यावर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (15 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,00,739 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,038 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,40,74,564 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 73 हजारांवर पोहोचला आहे.
कोरोनाचे रौद्ररुप! 'या' शहरात दर 2 मिनिटाला एक व्यक्ती येतेय पॉझिटिव्ह; प्रशासनाच्या चिंतेत भर
देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानाच्या जोधपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे की, दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सीएमएचओच्या रिपोर्टनुसार, शहरात 770 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय चार कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. जोधपूर आयआयटीमध्ये 74 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जोधपूर शहरातील राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्येही कोरोना विस्फोट झाला आहे.
कुंभमेळा (Kumbh Mela 2021) हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान आता हरिद्वारमध्ये फक्त दोन दिवसांत एक हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 594 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर सोमवारी हरिद्वारमध्ये 408 रुग्ण आढळले होते. कुंभमेळ्यातील शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 2812 वर पोहोचली आहे. सोमवती अमावस्येच्या पर्वावर होणाऱ्या महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.