नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 58 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,20,529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,380 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,86,94,879 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,44,082 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (5 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 15,55,248 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,67,95,549 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. मात्र या लाटेपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाने अतिशय चांगल्या प्रकारे सामना केला आहे. यामुळे कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारीही तेवढीच उत्तम झाली पाहिजे.
"सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट; वाचण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे..."
तिसऱ्या लाटेत तरुणांना संसर्गाचा धोका अधिक आहे, असं व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. देशातील महामारीबाबत तज्ज्ञांनी अतिशय स्पष्ट संकेत दिले आहेत. कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य आहे. ही लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या आणि उद्योगांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बँक, ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी उद्योग उभे करून महामारीचा यशस्वीपणे सामना केला. रेल्वे, विमानतळं, लिक्वीड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सैन्य दलांचा उपयोग केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशातील व्यवस्थापन चांगले होते. यामुळेच दुसऱ्या लाटेला लवकर नियंत्रित करण्याचा विश्वास आपल्याला मिळाला. दुसऱ्या लाटेतही कोरोना व्यवस्थापन म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन चांगले होते, असं म्हटलं आहे. देशात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे असंही सारस्वत यांनी सांगितलं. आपण बऱ्याच अंशी चांगलं काम केलं आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे. यामुळेच आता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं ते म्हणाले.