नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे. रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 54 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (16 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,213 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 524803 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज 38.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेटही 2.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाच राज्यांत कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, कर्नाटक आणि हरियाणामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र 4,024, केरळ 3,488, दिल्ली 1,375, कर्नाटक 648 आणि हरियाणामध्ये 596 रुग्ण आढळले आहेत. या पाच राज्यांत तब्बल 82.96 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. फक्त महाराष्ट्रात 32.95 टक्के रुग्ण सापडले आहेत.
ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह
मुंबईकरांसाठी आता धोक्याची घंटा आहे. कारण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. नव्या रुग्णांची संख्या एका हजाराहून अधिक आहे. ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे थैमान पाहायला मिळत आहे. 12 व्या जीनोम सीक्वेंसिंग दरम्यान स्वॅब टेस्टचा जो रिझल्ट समोर आला आहे तो चिंताजनक आहे. स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 14 ते 24 मे पर्यंत करण्यात आलेल्या जीनोम सीक्वेंसिगमध्ये 279 लोकांचे सँपल टेस्टसाठी पाठवले होते. 279 मधील तब्बल 278 लोक कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित आहेत. एका रुग्णाला डेल्टा स्ट्रेनची लागण झाली आहे. बीएमसीच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सँपलमधील 202 हे मुंबईचे होते.