नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत आता घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5,13,226 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (25 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5 लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,34,235 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4,22,46,884 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्गाचा धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय खतरनाक
कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील लोकांना वेगाने संक्रमित केले आहे. या व्हेरिएंटने ज्यांना यापूर्वी कोविड झाला होता किंवा ज्यांनी लस घेतली आहे. त्या लोकांनाही आपल्या जाळ्यात ओढलं आहे. कोरोनाची ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आल्यानंतर आता भीती आणखी वाढली आहे की कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट किंवा भविष्यात येणारे अन्य व्हेरिएंट लोकांना पुन्हा संक्रमित करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे, विशेषत: जे लोक पूर्वी कोविड झाले आहेत ते सहजपणे पुन्हा संसर्गाचे बळी होऊ शकतात. तथापि, याबद्दल फार मर्यादित माहिती आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चेस्ट स्पेशालिस्ट डॉ. मनोज गोयल यांनी कोविडचा पुन्हा संसर्ग होणे अशा प्रकारे परिभाषित केले जाऊ शकते की ज्या व्यक्तीला यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती ती पुन्हा संसर्गाची शिकार होते.
तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्गाची अनेक प्रकरणे
सौम्य लक्षणांमुळे, पुन्हा संसर्गाची प्रकरणे ओळखणं थोडं कठीण आहे कारण त्या व्यक्तीची कोविड चाचणी होत नाही. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्गाची अनेक प्रकरणे ही समोर आली आहेत. कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळा डेटा समोर आणला आहेत. ऑक्टोबर 2021 मधील एका रिसर्चनुसार, COVID-19 मधून बरे झालेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सुमारे 3 महिने ते 5 वर्षे टिकू शकते. वृद्ध लोक, मधुमेहाचे रुग्ण, हृदय, फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करणे आणि लसीकरण वेळेवर करणे आवश्यक आहे.