नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता तीन हजारांचा टप्पा पार केला आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 3,071 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (8 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,41,986 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,83,463 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,72,169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,44,12,740 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर होताहेत बरे'
भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. राजधानीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या कोरोना डेल्टा व्हेरिएंटसह, ओमायक्रॉन व्हेरिएंट देखील पसरत आहे. कोरोनाच्या संकटात आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर बरे होत आहेत. ओमायक्रॉन हा सौम्य आहे आणि डेल्टाच्या तुलनेत त्याची लागण झालेल्या रुग्णांना कमी वेळात डिस्चार्ज दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 185 रुग्ण आले आहेत. त्यापैकी 150 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. रुग्णांपैकी बहुतेक जणांना फक्त सौम्य लक्षणे आहेत आणि 5 ते 7 दिवसांनी डिस्चार्ज मिळत आहे. तर डेल्टाच्या काळात 14 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत असे. अशा रूग्णांवर ओमायक्रॉन डेडिकेटेड हॉस्पिटल असलेल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये देखील उपचार केले जातात. रुग्णालयाचे संचालक डॉ. सीएल गुप्ता यांनी आतापर्यंत 30 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. बहुतेक रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि प्रोटोकॉलनुसार निगेटिव्ह चाचणी घेतल्यानंतर आठव्या दिवशी त्यांना सोडण्यात येत आहे. रुग्ण लवकर बरे होत आहेत. डेल्टामध्ये 14 दिवस लागायचे आणि बरेच रुग्ण दोन महिन्यांहून अधिक काळ दाखल होते. अशी स्थिती या प्रकरणात अद्याप दिसलेली नाही असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.